सोलापूर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित अंमलबजावणीच्या विरोधात सोलापुरात २७ जुलै २०२६ रोजी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने पत्रकार परिषदेत दिली.समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील ५९ जातींना गेल्या सुमारे ७० वर्षांपासून १३ टक्के आरक्षण लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुभवाधारित (एम्पिरिकल) डेटा व सांख्यिकी अहवालाच्या आधारे अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणासंदर्भात निर्णय दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करून अहवाल स्वीकारल्याचा दावा कृती समितीने केला. समितीचा आरोप आहे की, या प्रक्रियेत अनुसूचित जातीतील इतर समाजांच्या प्रतिनिधींना पुरेशी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील विविध समाजघटकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याबाबत केलेल्या विधानालाही विरोध दर्शविला असून, हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.याच पार्श्वभूमीवर २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून महामोर्चाला प्रारंभ होणार असून पुनम गेट येथे सभेने त्याचा समारोप होणार आहे.महामोर्चामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, सुहास खामकर, रुक्मिणीताई लोंढे (जालना), पी. एन. केंगार तसेच अनुसूचित जातीतील विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.कृती समितीने आंबेडकरी विचारांच्या विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्था तसेच अनुसूचित जातीतील सर्व घटकांना मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.पत्रकार परिषदेला जनार्दन शिंदे, कुमार चन्ना, सचिन गुळग, राजाभाऊ सोनकांबळे, श्याम क्षीरसागर, प्रशांत गोणेवार, प्रविण कांबळे, सीमित कांबळे, अतिश बनसोडे, विठ्ठल व्हनमाणे, कमलाकर बनसोडे, विनोद इंगळे, सिद्धार्थ कांबळे, शरणू हजारे आणि विश्वजीत सरवदे आदी उपस्थित होते.
Tags:
सोलापूर
