२४ तासांत घरफोडीचा छडा; दोन सराईत चोरटे जेरबंद, ६.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 

सोलापूर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत दोन सराईत चोरट्यांना अटक केली. आरोपींकडून सोन्याचे २८.९५ ग्रॅम दागिने, चांदीचे ३६४ ग्रॅम दागिने, २५ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व स्क्रू-ड्रायव्हर असा एकूण ६ लाख ३ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.फिर्यादी गौरीशंकर नागनाथ कोळी (वय ५५, रा. बसवेश्वरनगर, नई जिंदगी, सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ जुलैच्या रात्री घराला कुलूप लावून ते शेजारील दुसऱ्या घरात झोपण्यासाठी गेले होते. ७ जुलै रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाहेर आल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. लोखंडी कपाटातील सुमारे २८.९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३६५ ग्रॅम चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख असा सुमारे ५.०३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी यशवंतराव चव्हाण मैदान, शांतीनगर परिसरात सापळा रचून जिबरान उर्फ शोएब युनूस शेख (वय २१) आणि प्रशांत नागेश खंदारे (वय १९) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीतील सर्व दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि स्क्रू-ड्रायव्हर जप्त करण्यात आला.पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावून चोरीचा जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. अटक करण्यात आलेला जिबरान उर्फ शोएब शेख हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही घरफोडी व इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार आणि पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post