पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकार' पुरस्कार युवा पत्रकार अमोल कुलकर्णी यांना जाहीर

सोलापूर (प्रतिनिधी)-पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्रच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकार पुरस्कार – २०२६' यंदा महाराष्ट्र पोलीस वार्ता न्यूज पोर्टलचे संपादक युवा पत्रकार अमोल कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन, उपोषण, निवेदने आणि शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. पत्रकारांसाठी ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य योजना, शासनमान्य नोंदणी, साप्ताहिक वृत्तपत्रांवरील जाचक अटी रद्द करणे, यूट्यूब व न्यूज पोर्टलला शासकीय मान्यता, ज्येष्ठ संपादकांना मासिक पेन्शन, पत्रकारांवरील हल्ल्यांबाबत कठोर कारवाई तसेच पत्रकारांना विनाअट व विनाजामीन पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यासह विविध मागण्यांसाठी समितीने सातत्याने आवाज उठवला आहे.याचबरोबर समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने समितीकडून दरवर्षी विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाचा 'आदर्श पत्रकार पुरस्कार' अमोल कुलकर्णी यांना जाहीर झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, सोलापूर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, उपाध्यक्ष अमर पवार आणि शहराध्यक्ष आन्सर तांबोळी (बी.एस.) यांनी दिली.

वंचितांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज-अमोल कुलकर्णी यांनी पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता सामाजिक चळवळ म्हणून स्वीकारली आहे. महाराष्ट्र पोलीस वार्ता न्यूज पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे वृत्तांकन केले आहे. विशेषतः वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी प्रशासनापर्यंत त्यांचा आवाज पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर पत्रकार सुरक्षा समितीने उभारलेल्या आंदोलन, उपोषण आणि जनजागृती मोहिमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. पत्रकारितेतील त्यांचे योगदान, सामाजिक बांधिलकी आणि निःस्वार्थ कार्याची दखल घेत समितीने त्यांची राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकार' पुरस्कारासाठी निवड केली.या पुरस्काराच्या घोषणेनंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संघटनांकडून अमोल कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post