सोलापूर (प्रतिनिधी)- शेगावीचा राणा माहेरी निघाला |संगे संत मेळा भजनी रंगला ||लक्ष लक्ष कंठातूनी गावूनी अभंग | गजाननाचे भजन lचंद्रभागा हर कुणी जाई गजानना गजानना lपंढरीत चैतन्याचा मोगरा फुलला ll
शेगावीचा राणा माहेरी निघाला l या अभंगाचे गायन करत टाळ मृदंगाच्या गजरात ७०० हून अधिक वारकऱ्यांच्या सहभागाने सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे रविवार २१ जून रोजी सकाळी ७.३० मार्गस्थ झाली. श्रींच्या पालखी पायी वारीचे यंदा ५७ वे वर्ष आहे.आसमंतात टाळ-मृदंगांचा निनाद घुमत आहे. ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताकांची उधळण, "गण गण गणात बोते"चा अखंड जयघोष आणि भक्तांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहिले की मन आपोआपच महाराजांच्या चरणी नतमस्तक होते.लाल फेट्यात सजलेले महाराज भक्तांना दर्शन देत आहेत. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाची नजर एकटक पालखीकडे लागलेली आहे. कुणी हात जोडून उभे आहे, कुणी नम्रपणे मस्तक टेकवत आहे, तर कुणी आनंदाश्रूंनी डोळे भरून घेत आहे. हे दृश्य पाहताना एकच भावना मनात दाटून येते – "खरंच, संतांचा सहवास हा ईश्वरप्राप्तीचाच मार्ग आहे."
ज्ञान, भक्ती आणि सेवाभावाचा संदेश देत ही पवित्र पालखी बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव (उस्मानाबाद) आणि सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांमधून प्रवास करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. २३ जुलै २०२६ रोजी श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आगमन करणार असून, दि. २३ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर येथे मुक्काम राहील.त्यानंतर दि. २८ जुलै २०२६ रोजी श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथून शेगावकडे परतीच्या प्रवासासाठी प्रस्थान करेल.सुमारे दोन महिन्यांच्या या पवित्र पदयात्रेनंतर १९ ऑगस्ट २०२६ रोजी श्रींचे श्री क्षेत्र शेगाव येथे स्वगृही भव्य, दिव्य आणि उत्साहपूर्ण आगमन होणार आहे.
Tags:
सोलापूर