उजनी धरण हे सोलापूर, पुणे आणि परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा आणि उद्योगांचा जीवनाधार आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उजनीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, रासायनिक खतांचा अतिवापर आणि विविध प्रदूषकांमुळे पाण्याची गुणवत्ता घसरत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.
याच पार्श्वभूमीवर "उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो का?" हा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत. या प्रश्नाचे उत्तर भावनेतून नव्हे, तर वैज्ञानिक तपासणी आणि संशोधनातूनच मिळू शकते. आजघडीला उजनीचे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतो, असा कोणताही ठोस वैज्ञानिक निष्कर्ष उपलब्ध नाही. मात्र पाण्यात जर जड धातू, विषारी रसायने किंवा इतर घातक प्रदूषक निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळले, तर दीर्घकाळ अशा पाण्याच्या संपर्कामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषयात शासनाने अधिक पारदर्शक भूमिका घेण्याची गरज आहे. पाण्याचे नियमित नमुने तपासून त्याचे अहवाल सार्वजनिक करणे, नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करणे आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.
आरोग्य विभागानेही कॅन्सरसह इतर गंभीर आजारांच्या प्रमाणाचा अभ्यास करून आवश्यक असल्यास विशेष आरोग्य सर्वेक्षण हाती घ्यावे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अहवालांवर आधारित माहिती स्वीकारावी.सोलापूर जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत लवकरच इंडियन मेडिकल असोसिएशन अथवा अन्य तपास यंत्रणा यांच्या मदतीने तपासणी लवकरच पाण्याची तपासणी केली जाईल असे सांगितले परंतु या गोष्टींची अंमलबजावणी होणार की फक्त पत्रकार परिषदेतील घोषणाच राहणार हे देखील तितकतेच असणार आहे.
उजनी धरण हे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर लाखो लोकांच्या जीवनाशी जोडलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे राजकारण किंवा अफवांच्या चष्म्यातून नव्हे, तर विज्ञान, पारदर्शकता आणि जनहिताच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. सुरक्षित पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो अबाधित राखण्यासाठी शासन, उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
अक्षय बबलाद - संपादक - दैनिक लोकशाही मतदार
