शांती चौकातील पाणी टाकीखाली तरुणाचा निर्घृण खून; अवघ्या काही तासांत तिघे आरोपी जेरबंद : एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने गुन्ह्याचा छडा

 

सोलापूर (प्रतिनिधी)- शहरातील शांती चौक परिसर बुधवारी मध्यरात्री रक्तरंजित झाला. जुन्या वादाच्या रागातून तीन मित्रांनी मिळून उमर मौलाली बिराजदार (वय २२, रा. मजरेवाडी, नई जिंदगी) याच्यावर कोयत्याने सपासप वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या खळबळजनक गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत तिन्ही संशयितांना ताब्यात घेत पोलिसांच्या कार्यक्षमतेची प्रचिती दिली.या प्रकरणी मन्सूर नदाफ (वय २०), अविनाश चव्हाण (वय २२) आणि आहाद सय्यद (वय २३) यांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती.मिळालेल्या माहितीनुसार, उमर बिराजदार हा सोलापूरहून कर्नाटकातील कलबुर्गी येथे चिकन सेंटरवर काम करत होता. तो दर पंधरा दिवसांनी आपल्या घरी येत असे. मंगळवारी (ता. ४) तो रेल्वेने सोलापुरात आला होता. प्रवासादरम्यान त्याचा मोबाईल चोरीला गेल्याने बुधवारी नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी तो घराबाहेर पडला होता.याचदरम्यान संशयितांनी उमरला मद्यपान करण्याच्या बहाण्याने शांती चौकातील पाण्याच्या टाकीजवळ नेले. मद्यपान सुरू असताना जुन्या वादाचा विषय निघाल्याने शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात झाले. तिघांनी सोबत आणलेल्या कोयत्याने उमरच्या डोक्यावर आणि हातांवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या उमरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.गुरुवारी (ता. ६) सकाळी सुमारे सातच्या सुमारास शांती चौकातील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पवार, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले.या घटनेमुळे शांती चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्ह्यामागील नेमके कारण, पूर्वीचा वाद आणि हल्ल्याचा संपूर्ण कट याबाबत एमआयडीसी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post