दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांसाठी शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी लोकअदालत आयोजित केली आहे. या लोकअदालतीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना कर सवलत मिळेल, असे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले. मनपाने यंदा ४२० कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. यापैकी नोव्हेंबरअखेर ११० कोटींचा कर वसूल झाला आहे. मनपा आयुक्तांनी यावर्षी थकबाकी वसुलीची अभय योजना बंद केली आहे. मागील महिन्यात २५ हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतदारांना नोटिसा बजावल्या होत्या. या थकबाकीदारांनी थकीत कराची रक्कम एकवट भरल्यास दंडाच्या रकमेत ५० टक्के सूट मिळेल. ज्यांना नोटिसा मिळालेल्या नाहीत त्यांनीही आपल्या थकबाकीबाबत मनपाकडे चौकशी करावी. लोकअदालतीमध्ये सहभागी व्हावे. अन्यथा जप्तीची कारवाई होईल, असेही लोकरे यांनी सांगितले.
प्रशासनाची महत्त्वाची सूचना
थकबाकीमधील शास्तीमध्ये माफी हवी असेल तर प्रशासनाकडे सहमतीचा अर्ज भरून द्यावा लागेल. कर संकलन कर्मचाऱ्यांकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. हे अर्ज भरल्यानंतर शास्तीमध्ये माफी मिळणार आहे, असे कर संकलनप्रमुख युवराज गाडेकर यांनी सांगितले.
Tags
सोलापूर