सोलापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड तात्काळ थांबवून महामार्गांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.सोलापूर येथील बालाजी सरोवर परिसरात झालेल्या भेटीदरम्यान उपमहापौर देवकर यांनी पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा ठामपणे मांडला. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग क्र. 54 वरील सोलापूर ते विजापूर या सुमारे 102 किलोमीटर मार्गाच्या दुतर्फा देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे वाढते प्रदूषण नियंत्रणात येण्यास मदत होईल तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.रोपटे भेट देत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश - यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रतीकात्मक रोपटे भेट देत “विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे,” असा संदेश दिला. त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याची माहिती उपमहापौरांनी दिली.या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नगरसेवक सात्विक बडवे, प्रशांत बडवे, पंचायत समिती सदस्य अंबिकाताई पाटील, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.“हरित भारताच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग परिसरात वृक्षलागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ झाडे लावून चालणार नाही, तर त्यांच्या संवर्धनासाठी आणि संगोपनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे मत उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले.
ठळक मागण्या
▪️ राष्ट्रीय महामार्गावरील बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबवावी.
▪️ सोलापूर–विजापूर NH-54 मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण मोहीम राबवावी.
▪️ ‘हरित महामार्ग धोरणा’ची काटेकोर अंमलबजावणी करावी.
▪️ वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोलापूर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
छाया : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रोपटे भेट देताना उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर. समवेत आमदार सुभाष देशमुख, नगरसेवक सात्विक बडवे व अन्य मान्यवर.
