वळसंग (प्रतिनिधी)- वळसंग पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे एका महिला प्रवाशाची हरवलेली पर्स अवघ्या काही तासांत शोधून सुरक्षित परत करण्यात यश आले. या कार्यवाहीमुळे पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे 4.00 वाजण्याच्या सुमारास महिला प्रवासी फातिमा गुडू शेख (वय 65, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) या वळसंग पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यांनी तोंडी माहिती देताना सांगितले की, त्या सोलापूरहून वळसंगकडे स्वारगेट–गुलबर्गा एस.टी. बसने प्रवास करीत होत्या. वळसंग बसस्थानकावर उतरल्यानंतर त्यांची पर्स गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास मालचे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल यादव आणि महिला पोलीस हवालदार अनिशा पटेल यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास मालचे यांनी तत्काळ अक्कलकोट बस आगाराचे एस.टी. कंट्रोलर अंबाना कोळी यांच्याशी संपर्क साधून संबंधित बस अक्कलकोट डेपोमध्ये पोहोचल्याची खात्री केली व बसमध्ये हरवलेली पर्स शोधण्याबाबत सूचना दिल्या.एस.टी. प्रशासनाच्या सहकार्याने संबंधित बसची तपासणी करण्यात आली असता महिला प्रवाशाची हरवलेली पर्स अक्कलकोट येथे मिळून आली. पर्समध्ये मोबाईल फोन, रोख रक्कम, अंदाजे 8 ग्रॅम सोन्याचे बोरमाळ तसेच इतर महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित अवस्थेत आढळून आल्या.यानंतर सर्व मुद्देमाल वळसंग पोलीस ठाण्यात आणून संबंधित महिला प्रवासी फातिमा शेख यांच्याकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आला. पोलिसांच्या व एस.टी. प्रशासनाच्या तत्परतेमुळे हरवलेला मौल्यवान ऐवज सुरक्षित मिळाल्याने महिला प्रवाशांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले.या यशस्वी कार्यवाहीमुळे वळसंग पोलीस ठाण्याच्या सतर्कतेचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
Tags:
सोलापूर जिल्हा
