जबरी चोरी करून परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत आरोपी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध

 

सोलापूर (प्रतिनिधी)-परिसरात जबरी चोरी, दहशत निर्माण करणे तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या सराईत आरोपी प्रदिप मौला गायकवाड (वय ३३, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६, सलगर वस्ती, सोलापूर) याच्यावर एमपीडीए (MPDA) कायदा, १९८१ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.प्रदिप गायकवाड हा सोलापूर शहरातील सदर बझार, सलगर वस्ती, विजापूर नाका व फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायद्यासाठी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरोधात जबरी चोरी, दहशत निर्माण करणे व सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या स्वरूपाचे एकूण १२ गंभीर गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दहशतीमुळे अनेक नागरिक त्याच्याविरोधात उघडपणे पोलिसांना माहिती देण्यासही धजावत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.प्रदिप गायकवाड यास गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ११० व १०७, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. तसेच त्याच्यावर यापूर्वीही एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र, त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्या.या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दि. २१ मे २०२६ रोजी एमपीडीए अधिनियम, १९८१ च्या कलम ३ अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. त्यानुसार आरोपीस ताब्यात घेऊन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, वपोनि नामदेव बंडगर तसेच एमपीडीए पथकातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली.दरम्यान, शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड व समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवून एमपीडीए कायद्यान्वये पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची ही ५६ वी एमपीडीए कारवाई असल्याची माहिती देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post