जोडभावी पेठ पोलिसांची तत्पर कामगिरी : अवघ्या दोन तासांत हरवलेला ६० हजारांचा आयपॅड शोधून विद्यार्थिनीला सुपूर्द

सोलापूर (प्रतिनिधी)- अभियांत्रिकी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी नामे संस्कृती अमोल केशरीवार हिचा घरातून हरवलेला सुमारे ₹६० हजार किमतीचा ॲपल कंपनीचा आयपॅड अवघ्या दोन तासांत शोधून काढत जोडभावी पेठ पोलिसांनी तत्परतेचे उदाहरण दाखवून दिले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मे २०२६ रोजी संस्कृती अमोल केशरीवार हिचा ॲपल कंपनीचा आयपॅड घरातून गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. आयपॅड हरवल्याने विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी तिने तात्काळ जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मुलानी साहेब तसेच डीबी पथक प्रमुख श्री. महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेत पोलीस हवालदार क्र. १६८५ आरेनवरु आणि पोलीस शिपाई क्र. १८५२ मलाबत्ते यांनी तांत्रिक माहिती व तपासाच्या आधारे वेगाने हालचाली करत अवघ्या दोन तासांच्या आत हरवलेला आयपॅड शोधून काढला.पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे विद्यार्थिनीला मोठा दिलासा मिळाला असून, शोधून काढलेला आयपॅड वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मुलानी साहेब यांच्या हस्ते संबंधित विद्यार्थिनी संस्कृती केशरीवार हिला परत सुपूर्द करण्यात आला.या कामगिरीबद्दल विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबीयांनी जोडभावी पेठ पोलिसांचे आभार मानले असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनी कोणतीही वस्तू हरवली अथवा संशयास्पद घटना घडल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post