सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार कामगार संघटनांनी महापौर विनायक कोडगल यांच्याकडे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, क्षयरोग विभागातील सुपरवायझर सचिन मसके यांना अचानक त्रास होऊन ते अधिकाऱ्यांच्या दालनातच कोसळले. त्यानंतरही वैद्यकीय अधिकारी म्हणून आवश्यक मदत न करता त्यांची खिल्ली उडविण्यात आल्याचा गंभीर आरोप कामगार युनियनचे प्रमुख बाबूसाहेब सदाफुले यांनी केला आहे. या घटनेमुळे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.
दरम्यान, डॉ. अरुंधती हराळकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत ते खोटे आणि तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय आहे, याकडे महापालिका प्रशासनासह कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Tags:
सोलापूर