सोलापूर(प्रतिनिधी)- शहरातील घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या दिशेने शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत तब्बल १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च २०२६ रोजी भारत नगर, जुना विडी घरकुल परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी फिर्यादी अंबादास मधुकर पल्ली यांच्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याच परिसरात दुसऱ्या एका घरफोडीत लॅपटॉप चोरीची घटना घडली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शहर गुन्हे शाखेने आरोपीचा माग काढला.पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, घरफोडीतील संशयित आरोपी चोरीचे सोने विक्रीसाठी शास्त्रीनगर येथील बसस्थानक परिसरात येणार आहे.माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत दिपक वैकुंठ श्रीगण (वय २३, रा. भारत नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.आरोपीकडून १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ९६ हजार रुपये) तसेच एमएसआय कंपनीचा लॅपटॉप (किंमत २३ हजार रुपये) असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस तपासात आरोपी हा घरफोडी चोरीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरासह इतर जिल्ह्यांमध्येही विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या अटकेमुळे आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप जावळे, अनिल जाधव, आबाजी सावळे, विठ्ठल यलगार, उमेश पवार, महेश पाटील तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी बजावली.घरफोडीच्या गुन्ह्यांचा वेगाने छडा लावत आरोपीला अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल शहर गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Tags:
सोलापूर