सोलापूर(प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सोलापूर येथील सुरवसे बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि कुतूहल पाहण्यासारखे होते. शाळा परिसर आकर्षक सजावट, रंगीबेरंगी फुगे आणि स्वागत फलकांनी सजविण्यात आला होता.यावेळी शाळेच्या विश्वस्त राखीताई द. सुरवसे व मुख्याध्यापिका शुभांगी सोमनाथ लोखंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणाची ओळख करून देत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.स्वागत प्रसंगी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देताना शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनात सहशिक्षिका सुवर्णा कुलकर्णी,रईसा खान , मेघा सावंत कर्मकर्मचारी उर्मिला रसाळ ,रतन गोरे,सोनाली जगताप यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंदाने सहभाग नोंदविला. पालकांनीही शाळेच्या स्वागत उपक्रमाचे कौतुक केले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात सुरवसे बालक मंदिर शाळेला यश मिळाले असून हा दिवस विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी संस्मरणीय ठरला.

