भविष्य निर्वाह निधीच्या ५ लाखांच्या मंजुरीसाठी ६ हजारांची लाच; लाचखोर अधीक्षक, लिपीक व ग्रंथपाल एसीबीच्या जाळ्यात

सोलापूर (प्रतिनिधी)- शिक्षकाच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यातील ५ लाख रुपये मंजूर करून देण्यासाठी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई केली आहे. या प्रकरणात ग्रंथपालाला रंगेहात पकडण्यात आले असून अधीक्षक व वरिष्ठ लिपिकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे माध्यमिक शिक्षण विभागातील सहशिक्षक असून त्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून ५ लाख रुपये काढण्यासाठी अर्ज केला होता. मात्र ही रक्कम मंजूर करण्यासाठी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.एसीबीने १५ जून रोजी केलेल्या पडताळणीत अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड यांनी १ हजार रुपये, वरिष्ठ लिपिक अण्णासाहेब दगडू मेटकरी यांनी ४ हजार रुपये आणि ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले यांनी १ हजार रुपये अशी एकूण ६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर १८ जून रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी ग्रंथपाल विक्रम बारबोले यांनी पंचांसमक्ष ६ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. पडताळणी आणि सापळा कारवाईतील पुराव्यांच्या आधारे अधीक्षक बालवाड, वरिष्ठ लिपिक मेटकरी आणि ग्रंथपाल बारबोले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.या प्रकरणाची नोंद सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाण्यात करण्यात येत असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व १२ अन्वये कारवाई केली जात आहे.ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, एसीबी सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक शैलेश पवार व रवींद्र लांभाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post