सिद्धेश्वर प्रशालेत संस्कारमय वातावरणात प्रवेशोत्सव उत्साहात

सोलापूर (प्रतिनिधी)- श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी, नंदीध्वज पूजन आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.‘विविधतेतून संस्कृतीचे दर्शन’ या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्यासह विविध ऐतिहासिक व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे वेष परिधान करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा, सैनिक, एनसीसी व वारकरी वेशभूषेद्वारे भारतीय संस्कृतीचे वैभव साकारण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त तथा ऑफिस सेक्रेटरी नीलकंठ कोनापुरे यांच्या हस्ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर, सरस्वती माता आणि नंदीध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले.‘एक पेड माँ के नाम’ आणि ‘हिरवा माझा ठसा’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांसह पालकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी, विश्वस्त प्रभुराज मैंदर्गीकर, उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे, पर्यवेक्षक विनोद बिराजदार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा आणि संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानंतर नियमित अध्यापनास प्रारंभ करण्यात आला. भारतीय संस्कृतीची जपणूक आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post