सोलापूर (प्रतिनिधी)- सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गड्डा यात्रेदरम्यान घडलेल्या सोन्याचे कडे चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून १९ ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे कडे जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी रोहिणी विकास कांभारकर (वय ४४, रा. सुंदर संकुल, मगरपट्टा रोड, हडपसर, पुणे; सध्या रामलाल चौक, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.०० वाजण्याच्या दरम्यान होम मैदानावरील गड्डा यात्रेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे चोरून नेले होते. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याच्या तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) रविंद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. माहिती मिळाली की, चोरीतील सोन्याचे कडे विक्रीसाठी एक संशयित ७० फूट रोड परिसरातील सराफ बाजारात येणार आहे.यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून संशयित पियुष राजू शिंदे याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले १ लाख रुपये किमतीचे १९ ग्रॅम सोन्याचे कडे जप्त करण्यात आले असून गुन्ह्याची यशस्वी उकल झाली.ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रितम यावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल सावंत, पोलीस हवालदार संतोष पापडे, मुलाणी, राजेश चव्हाण, प्रमोद पकाले तसेच पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण, हणमंतु पुजारी, विशाल बोराडे, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे आणि आनंद निंबाळकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
Tags:
सोलापूर
