सोलापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराला प्रभावी आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त अभियान’ आणि ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत ‘ड्रग फ्री कॅम्पस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला सोलापूर शहरातील शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ४०० ते ४५० प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते.अंमली पदार्थांचे सेवन, विक्री, साठवणूक आणि प्रसार यांना शैक्षणिक परिसरात प्रतिबंध करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील यांनी केले. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी उपस्थितांना अंमली पदार्थांविरोधातील प्रभावी उपाययोजना, पोलीस-शैक्षणिक संस्था समन्वय आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सोनाली काळे, उपसंचालिका, मुक्तांगण डेडिकेशन सेंटर, पुणे तसेच रामचंद्र वाघमारे, सारथी यूथ फाउंडेशन, सोलापूर यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. डॉ. संतोष कोटी, प्राचार्य, वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर आणि विद्यानंद स्वामी, सचिव, सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनीही मनोगत व्यक्त केले.शैक्षणिक संस्थांमध्ये समित्या, सतर्कता आणि जनजागृतीवर भर- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधक समित्या स्थापन करणे, सतर्कता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये स्वयंसेवक घडविणे, ‘कलंक नव्हे, संवेदनशीलता’ या दृष्टिकोनातून व्यसनाधीन विद्यार्थ्यांना मदत करणे तसेच पोलीस व शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शाळा-महाविद्यालय प्रशासन, शिक्षक, पालक, पोलीस आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन- हा कार्यक्रम पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) वृष्टी जैन, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.पोलीस निरीक्षक, म.सु.वि. कक्ष आसिफ राजा शेख, पोलीस निरीक्षक एएचटीयु स्नेहा म्हेतर, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती येळे तसेच महिला कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.अंमली पदार्थमुक्त सोलापूर घडविण्यासाठी ‘प्रतिबंध, जनजागृती आणि कठोर कारवाई’ या त्रिसूत्रीवर भर देत शैक्षणिक परिसर ड्रग फ्री करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

