सोलापूर (प्रतिनिधी)- शहरात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील मौल्यवान साहित्य आणि रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा फौजदार चावडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली परिसरातील सात सराईत आरोपींना ताब्यात घेत, पोलिसांनी सोलापूरसह महाराष्ट्र व तेलंगणातील तब्बल सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून तीन लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप बॅग आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.दि. ६ जुलै रोजी सोलापूर शहरात काही तासांच्या अंतराने तीन वाहनांच्या काचा फोडून चोरीच्या घटना घडल्या. पार्क चौक, जुना पुणे नाका आणि लोटस वाईन शॉप परिसरात पार्क केलेल्या कारमधून लॅपटॉप, बॅग, कागदपत्रे तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले.यानंतर २८ जुलै रोजी सिद्धेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीच्या कारची काच फोडून तब्बल चार लाख रुपयांची रोकड चोरी करण्यात आली. या सलग घटनांमुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
सीसीटीव्हीत दिसले सात चेहरे; मात्र ओळख पटवणे ठरले आव्हान- फौजदार चावडी पोलिसांच्या डी.बी. पथकाने घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात कारच्या काचा फोडण्यासाठी आलेले सात संशयित अस्पष्टपणे कैद झाले होते. पोलिसांनी आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा बारकाईने अभ्यास करून त्यांची ओळख पटवली.मात्र आरोपी सतत ठिकाण बदलत असल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मिरज रेल्वे स्टेशन परिसरात आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले; मात्र आरोपी हातावर तुरी देऊन पसार झाले. त्यानंतर आळंदी येथेही त्यांचा शोध घेण्यात आला.
‘शिकारी’ परत सोलापुरात येणार, पोलिसांनी टाकला सापळा!- आरोपींच्या हालचालींचा अभ्यास केल्यानंतर ते गुन्हे करण्यासाठी पुन्हा सोलापुरात येण्याची शक्यता पोलिसांनी हेरली. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड तसेच यापूर्वी गुन्हे केलेल्या परिसरांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.अखेर ६ ऑगस्ट रोजी आरोपी पुन्हा सोलापुरात कारच्या काचा फोडून चोरीच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून डी.बी. पथकाने पंचकट्टा ते होम मैदानदरम्यान सापळा रचला आणि सातही आरोपींना ताब्यात घेतले.
तमिळ भाषेचा अडसर; दुभाषकाच्या मदतीने तपास - ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलिसांशी बोलताना जाणूनबुजून केवळ तमिळ भाषेत संवाद साधला. त्यामुळे पोलिसांसमोर भाषेचे आव्हान निर्माण झाले. अखेर दुभाषकाच्या मदतीने चौकशी करण्यात आली. आरोपींच्या अंगझडतीत ३ लाख रुपये रोख, लॅपटॉप बॅग आणि इतर कागदपत्रे आढळून आली.
आरोपींची नावे- षणमुगम अमरनाथन, आदिथन थंडयुथपाणी, सेरन मुकुंधन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रमण्यम, मनोजकुमार अनबलगन आणि कमलकन्नन गणेसन अशी आहेत. हे सर्व आरोपी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली व परिसरातील रहिवासी असून मजुरीचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोलापूरपासून हैदराबादपर्यंत गुन्ह्यांचे जाळे- पोलिसांच्या चौकशीत दि. ४ जुलै ते ३० जुलैदरम्यान आरोपींनी सोलापूर, मिरा-भाईंदर-वसई-विरार, तुळजापूर-धाराशिव, पिंपरी चिंचवड तसेच हैदराबाद परिसरात कारच्या काचा फोडून चोरी केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या टोळीचा गुन्हेगारी पसारा आणखी मोठा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी आणखी किती गुन्हे केले आहेत, त्यांच्यामागे अन्य साथीदार आहेत का आणि चोरीचा मुद्देमाल कुठे विल्हेवाट लावला जात होता, याचा तपास आता केला जात आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई - पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी डी.बी. पथकाचे प्रमुख सपोनि संजय क्षिरसागर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.सतत बदलणारे ठिकाण, वेगळी भाषा आणि नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हे करणाऱ्या टोळीचा माग काढत पोलिसांनी अखेर त्यांना सोलापुरातच जेरबंद केले. त्यामुळे ‘कार पार्क करा आणि निर्धास्त व्हा’ अशी मानसिकता ठेवणाऱ्या नागरिकांसाठी ही कारवाई मोठा इशारा असून, वाहनात लॅपटॉप, रोकड किंवा मौल्यवान वस्तू ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
